नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासोबतच विधानभवनातील कार्यालयही निश्चित झाले आहे. नवीन इमारतीत पहिल्याच माळ्यावर त्यांना कार्यालय देण्यात आले आहे. त्यांचा आवाका पाहता तीन मंत्र्यांचे कार्यालय त्यांना देण्यात आले.
राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यामुळे पवार यांच्यासाठी नव्याने उपमुख्यमंत्री निवास तयार करण्यात आले. सह पोलिस आयुक्त यांचा बंगला उपमुख्यमंत्री पवार यांच्यासाठी तयार करण्यात येत आहे.
तसेच विधानभवनातही त्यांच्यासाठी विशेष कार्यालय तयार करण्यात आले. त्यांच्या कार्यालयासाठी जुन्या व नवीन इमारतीमधील जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नवीन इमारतीत पहिल्याच माळ्यावर क्रमांक ००१ कार्यालय त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आले. येथे तीन मंत्र्यांसाठी कार्यालय तयार करण्यात आले होते. हे तिन्ही मिळून उपमुख्यमंत्री पवारांसाठी एक कार्यालय तयार करण्यात आले.
विधानभवनातील काम अंतिम टप्प्यात
७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असून, येत्या सोमवारपासून सचिवालय नागपुरात दाखल होणार आहे. त्यासाठी विधानभवनातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या रविवारपर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. येथे गार्डनमध्ये नव्याने लॉन तयार करण्यात येत असून, सुंदर वृक्षही लावण्यात येणार आहेत. १६० गाळ्यांचे अपूर्ण काम संथ गतीने सुरू असल्याने वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.