पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी केला सन्मान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला तर विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी मांडलेला ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानाने स्वीकारण्यात आल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी केली. त्यानुसार १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत पोहोचवले.
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे नाव अध्यक्षपदासाठी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या १३ घटक पक्षांनी हा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, जीतनराम मांझी, कुमारस्वामी, चिराग पासवान, सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी यांनी ओम बिर्ला यांच्या अर्जाला अनुमोदन दिले.
के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. एन. के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिले. ओम बिर्ला आणि के. सुरेश यांचे प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मांडण्यात आल्यानंतर हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी आवाजी मतदान घेतले. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महताब यांनी केली.
दुस-यांदा अध्यक्ष
ओम बिर्ला हे राजस्थानातील कोटा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी १७ व्या लोकसभेतही लोकसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना सलग दुस-यांदा संधी मिळाली. हंगामी अध्यक्ष बतृहारी महताब यांनी ओम बिर्ला यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.