किशनगंज : बिहारमधील किशनगंज येथील बहादुरगंज येथील पूल कोसळल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तुषार सिंगल यांनी गुरुवारी दिली.
माडिया या कनकाई नदीच्या उपनदीवर हा पूल बांधण्यात आला होता. या नदीच्या नेपाळमधील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाण्याचा जोर वाढल्याने हा पूल कोसळला. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. ७० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असलेला हा पूल २०११ मध्ये बांधण्यात आला होता.
बिहारमधील पूल कोसळण्याची आठवडाभरातील चौथी घटना आहे. या आधी अररिया, सिवान आणि महाराजगंज येथील पूलही कोसळले आहेत. या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले होते असा दावा स्थानिकांनी केला आहे. बिहारमध्ये सातत्याने घडणा-या या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.