नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारच्या कामांची माहिती देण्यासोबतच १९७५ मध्ये काँग्रेसने देशात लागू केलेल्या आणीबाणीचाही उल्लेख केला. दरम्यान, आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी संसद टीव्हीवर पंतप्रधान मोदींना वारंवार दाखवले गेल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर आरोप केला की, राष्ट्रपती मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावेळी पंतप्रधान मोदींना ७३ वेळा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फक्त ६ वेळा दाखवण्यात आले. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की राष्ट्रपतींच्या ५१ मिनिटांच्या अभिभाषणात कोणाला किती वेळा दाखवले गेले? सभागृह नेते नरेंद्र मोदी यांना ७३ वेळा, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ६ वेळा दाखवण्यात आले. सरकारमधील नेत्यांना १०८ वेळा, तर विरोधी नेत्यांना १८ वेळा दाखवले गेले. संसद टीव्ही सभागृहाचे कामकाज दाखवण्यासाठी आहे, कॅमेराजीवींसाठी नाही अशी बोचरी टीका त्यांनी केली.
मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर लिहिले की, मोदी सरकारने लिहिलेले राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकून असे वाटले की, पीएम मोदी निकाल मान्य करायला तयार नाहीत. देशातील जनतेने त्यांच्या ४०० पारच्या ना-याला नाकारले आणि भाजपला २७२ च्या आकड्यापासून दूर ठेवले अशी टीका त्यांनी केली.