बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हावेरी जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. बागडी तालुक्यातील गुंडनहल्लीजवळ हा अपघात झाला असून मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रकला मिनी बसने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की मिनी बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. या घटनेचे फोटोही व्हायरल होत असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिक शिवमोगा येथील रहिवासी होते. यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. यात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मिनी बसच्या चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातावेळी मिनी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे ट्रकला धडकल्यानंतर बसचा चक्काचूर झाला. पोलिस पुढील तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.