बीड : जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचे प्रसूतीसाठी सीझर करताना तिच्या आतड्याला छिद्र पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला त्रास होत असल्यामुळे तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक संतप्त झाले असून, दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तर, या प्रकरणात चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, बीड तालुक्यातील एक महिला ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तर, १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता तिला सीझरसाठी घेण्यात आले. पण, याचवेळी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या आतड्याला जखम झाली. धक्कादायक म्हणजे या महिलेला दुस-या दिवशी त्रास सुरू झाला आणि पोट देखील फुगले होते.
त्यामुळे, त्रास अधिक वाढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी तिला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या आतड्याला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांना देखील धक्का बसला. त्यामुळे नातेवाईक काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.