शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोटॉन संघटनेच्या वतीने शिक्षणाचे खाजगीकरण, संस्थाचालक शासन, प्रशासन यांच्याकडून कर्मचा-यावर होणा-या अन्याय अत्याचाराच्या विरोधात दि.२९ जून शनिवार रोजी तहसील कार्यालय शिरूर अनंतपाळ येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
चार टप्यात हे आंदोलन करण्यात येणार असून दि. १४ जून रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दि. २९ जून रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले, दि. १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध रॅली, मुंबईमध्ये राज्यस्तरीय महामोर्चा काढण्यात येणार आहे सर्व आंदोलने ही संविधानिक पद्धतीने व शांततामय मार्गाने केली जाणार आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन शैक्षणिक धोरण २०२० महाराष्ट्र राज्यात व देशात लागू करु नये, चार कामगार संहिता रद्द करावी, २००१ पूर्वीच्या महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्यावे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी, एससी, एसटी, ओबीसी यांचा सर्व विभागातील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, शाळांची नोंदणी पवित्र पोर्टलला करण्यात यावी, सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण शासनाने तात्काळ थांबवावे, एससी, एसटी,ओबीसी एसबीसी, एनटी , व्हीजे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम वाढवून द्यावी व उच्च शिक्षणासाठी पात्रता परीक्षा न घेता शिष्यवृत्ती देण्यात यावी, यांसह विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे प्रोटान, जिल्हाध्यक्ष बामसेफ लातूर (पश्चिम) एम.टी. सूर्यवंशी यांनी सांगितले.
याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे तालुका संयोजक कांबळे बाबुराव वामन, सूर्यवंशी एम.टी. प्रोटान, जिल्हाध्यक्ष बामसेफ लातूर (पश्चिम) बालाजी संभाजी भालेराव सचिव प्रोटान शिरूर अनंतपाळ, सुग्रीव सोनवणे, सुगावे एन.आर., कलबुर्गे उत्तम, बागवान एच. एम., बागवान एच.डी तालुकाध्यक्ष प्रोटान, सुनिल गायकवाड, काकडे हे उपस्थित होते.