मुंबई : विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभात्याग केला असून विरोधकांना बोलू दिले जात नाही. सभापती निलम गो-हे पक्षपातीपणाने वागत आहेत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. यावेळी, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना सत्ताधा-यांवर निशाणा साधला.
सभापती या पक्षपातीपणे वागत आहेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना काही बोलू देतात. उदाहरणार्थ, भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचे अभिनंदन करा असा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असे दानवे म्हणाले.
क्रिकेट संघ जिंकला. खेळाडूंची यात मेहनत आहे. रक्ताचे ते पाणी करतात. त्यांचे अभिनंदन सोडून बोर्डामध्ये असलेल्यांचे अभिनंदन करा म्हणतात. हा खेळाडूंचा अपमान आहे. भाजपला देशाशी काही देणघेणे नाही. स्वत: ओवाळून घेणे, चमकेगिरी करणे असे भाजप नेते करत आहेत. सत्ताधा-यांना बोलू दिले जाते आणि विरोधकांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केला आहे, असे दानवे म्हणाले आहेत.
शेलारांचे अभिनंदन का? : जगताप
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील सरकारवर टीका केली. आशिष शेलार यांचे अभिनंदन करण्याची काय गरज आहे. आयसीआयसीआयचे अध्यक्ष शरद पवार होते. ते बीसीसीआयचे अध्यक्ष नव्हते. ग्राउंडवर काम करणा-या कर्मचारीपासून सर्वांचे अभिनंदन करा. पण, सभापतींकडून जाणीवपूर्वक सत्ताधा-यांची बाजू घेतली जात आहे.
विरोधी पक्षाचा अधिकार डावलला : शिंदे
सभापती या स्पष्टपणे पक्षपातीपणा करत आहेत असे आम्हाला म्हणायचे आहे असे भाई जगताप म्हणाले. विरोधी पक्षाचा अधिकार डावलला जात आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले. विरोध यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.