सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत लिंबू पाणी, तसेच एक लिटर पाणी बॉटल देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सव्वा कोटीची निविदा काढल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मलवारी, तसेच यात्रा काळात प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण, तसेच विद्युत रोषणाई व्यवस्थेसाठी राज्य शासनाने पाच कोटी निधी मंजूर केल्याचीमाहितीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, यंदा डीपीसीमधून साडेचार ते पाच कोटीचा निधी वारीसाठी देण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही, तसेच पब्लिक अनान्समेंट सिस्टम, तसेच सार्वजनिक ठिकाणी लायटिंग अन् सुशोभीकरणासाठी दोन कोटीचा निधी, असे एकूण साडेचार कोटींचा निधी पंढरपूर वारीसाठी मिळणार आहे. बुधवारी (दि.१७) पंढरपूर आषाढी यात्रा होणार आहे. वारकऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी, तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून साडेचार कोटींचा निधी देण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. डीपीसीकडून पंढरपूर नगरपालिकेला सदर निधी देण्यात येणार आहे. प्रस्तावित निधी नगरपालिकेकडून खर्च करण्यात येणार आहे.