बसमधून काढणार मिरवणूक, वानखेडेवर सन्मान
मुंबई : प्रतिनिधी
भारताने २००७ साली पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आता मुंबईला ही संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबईत जोरदार सेलिब्रेशन होणार, हे आता समोर आले आहे.
भारताचा संघ गुरुवारी पहाटे नवी दिल्लीत उतरेल. त्यानंतर थोडा काळ ते हॉटेलमध्ये आराम करतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतील. पंतप्रधानांची भेट घेतल्यावर भारतीय संधी दिल्लीच्या विमानतळावर जाईल आणि तिथून ते मुंबईला निघतील. भारतीय संघ मुंबईला दुपारी ४ वाजता उतरेल. त्यानंतर भारतीय संघाला थेट नरिमन पॉइंट येथे नेण्यात येणार आहे. तिथून सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. येथे टीम इंडियाची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
२००७ साली जेव्हा भारताने टी-२० वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा निलांबरी नावाची बस खेळाडूंसाठी देण्यात आली होती. आताही अशीच एक खास बस भारतीय संघाला देण्यात येणार आहे. ही बस नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत जाणार आहे. हे अंतर १ किलो मीटर एवढे आहे. चाहत्यांची गर्दी पाहता हे अंतर कापायला एक ते दीड तास लागू शकतो. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे टीम इंडियाचा सत्कार होणार आहे. त्यासाठी भारताचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंचा उद्या मुंबईत भव्य सन्मान सोहळा पाहायला मिळणार आहे.