मुंबई : अक्षय कुमारच्या आगामी ‘सरफिरा’ सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात अक्षय कुमार, राधिका मदान, परेश रावल हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘सरफिरा’च्या टिझर, ट्रेलरने प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळवले आहे. अशातच ‘सरफिरा’मधले मराठी शब्द असलेले ‘चावट’ गाणे रिलीज झाले आहे. श्रेया घोषालच्या आवाजातलं हे गाणं प्रत्येक लग्नात वाजणार आणि सर्व लोक या गाण्यावर नाचणार यात शंका नाही.
सरफिरा या बहुप्रतिक्षित सिनेमातले गाणे चावट हे आगामी काळात प्रत्येक लग्नात वाजेल यात शंका नाही. महाराष्ट्रीयन थीम असलेला ट्रॅक पारंपारिक महाराष्ट्रीयन लग्नाचा आनंद उत्तम प्रकारे कॅप्चर करतोय. या गाण्यात राधिका मदानचा मराठमोळा लूक आणि तिचा सहजसोप्पा डान्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोय. मनोज मुंतशीर शुक्ला यांनी हे गाणे लिहिले आहे. श्रेया घोषालचा आवाज या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो आहे.
सरफिरा कधी रिलीज होणार?
सरफिरा सिनेमात अक्षय कुमारसोबत परेश रावल, राधिका मदन, आर. सरथ कुमार आणि सीमा बिस्वास हे कलाकार झळकत आहेत. याशिवाय मराठी अभिनेत्री इरावती हर्षे सिनेमात खास भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अक्षय कुमार आणि परेश रावल तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र येत आहेत.’सराफिरा’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. १२ जुलैला ‘सरफिरा’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा साऊथमध्ये गाजलेल्या ‘सूराराय पोट्रू’चा रिमेक आहे.