मुंबई : बिहारच्या पाटण्यात उघड झालेल्या नीट परीक्षेच्या घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडत आहेत. मराठवाड्याच्या लातूरला विद्येची नगरी म्हटले जाते, तिथे सीबीआयची टीम तपास करत आहे. तब्बल १० विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याचे प्रकरण पुढे आलेले आहे.
नीट परीक्षेत 10 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याची माहिती सीबीआय चौकशीत समोर आली असून सीबीआयचे अधिकारी लातूरात नीट परीक्षेच्या चौकशीसाठी ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे नीट बरोबर इतर स्पर्धा परीक्षांचे देखील प्रवेश पत्र अधिका-यांना तपासामध्ये आढळले आहेत. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये दोन आरोपी सध्या सीबीआयच्या अटकेत आहेत तर इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
अटकेत असलेल्या दोन आरोपींच्या मोबाईलमधून आतापर्यंत १० विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत गुणवाढ करुन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर हे १० विद्यार्थी कोण आहेत याचा मात्र खुलासा सध्या तरी झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आणि बिहार राज्यातील संशयास्पद परीक्षा केंद्राचा नेमका संबंध काय? याचा तपास आता सीबीआय अधिक वेगाने करत असल्याची माहिती आहे.
८ जुलै रोजी एकूण २६ याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’, ‘आयुष’ तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातात. सध्या अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या तिघांचे यामध्ये काय कनेक्शन आहे याची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.