शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक यंत्र महसूल मंडळात तर पाऊस शिवारात असा काहीसा प्रकार सध्या दिसून येत असून त्यामुळे पर्जन्यमापक यंत्रामध्ये पावसाची नोंद होत नसल्यामुळे महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्र व त्यात पावसाचा लहरीपणा शेतक-यांच्या मुळावर आले असून प्रत्येक शिवारात पडलेल्या पावसाची नोंद व्हावी, यासाठी प्रत्येक गावांत पर्जन्यमापक यंत्र बसवणे आवश्यक झाले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना मंडलात ठेवलेल्या पर्जन्यमापक यंत्रावरील नोंदीनुसार पावसाची नोंद केली जाते. सध्या पावसाच्या लहरीपणामुळे मंडळात कोरडे तर परिसरातील गावांत अतिवृष्टी होते. मात्र त्या पावसाची नोंद होत नसल्याने पिकांचे व शेतजमीनीचे नुकसान होऊनही फक्त पावसाची नोंद झाली नसल्याने शेतक-यांंना हक्काच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतक-यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान पावसाच्या लहरीपणामुळे गावाच्या अर्ध्या भागात पाऊस होतो तर उर्वरित भाग कोरडा असतो. अनेकदा पर्जन्यमापक यंत्र ठेवलेल्या मंडलात पाऊस होत नाही पण त्याच वेळी आसपासच्या गावात मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असतो. यात अनेकांच्या पिकांची नासाडी होते व शेत वाहून जाते पण मंडलाच्यादृष्टीने अतिवृष्टीची नोंद नसल्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाईला मुकावे लागते. मागच्या आठवड्यात साकोळ मंडळात गाव शिवांरासह घुगी, सांगवी, राणी अंकुलगा,बाकली या गावच्या शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यात कोवळी पिके वाहून गेल्याने शेतक-यावर दुबार पेरणीचे संकट आले तसेच शेतजमीन खरडून गेल्याने शेतक-याचे प्रचंड नुकसान झाले. परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला असताना साकोळ मंडळात फक्त ५ मिलीमीटरची नोंद झाल्याने शेतक-यांना नुकसान भरपाईला मुकावे लागले आहे. त्यामुळे पाऊस मोजण्याचे मंडळातील हे निकष शेतक-यासाठी अडचणीचे ठरत आहेत.