डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथल्या सिल्क्यारा बोगद्याचे काम सुरु असताना अचानक बोगद्याचा काही भाग कोसळल्याने त्यात ४१ कामगार अडकून पडले. गेल्या १२ दिवसांपासून या कामगारांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रशासनाचे काम सुरु आहे. बचाव मोहिम अंतिम टप्प्यात असून २१ जवानांच्या टीमने ऑक्सिजनसह बोगद्यात प्रवेश केला आहे. तसेच डझनभर रुग्णवाहिका बाहेर उभ्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यात फक्त १२ मीटर ड्रिलिंग बाकी आहे असून लवकरच चांगली बातमी मिळू शकते.
बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या बचावाची मोहिम आता अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची २१ जवानांच्या टीमने ऑक्सिजन आणि मास्कसह सिल्क्यारा बोगद्यात एका ट्युबच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. दरम्यान, कामगारांना सुखरुप बाहेर आणल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. कारण गेल्या १२ दिवसांपासून हे लोक बोगद्यात अडकून पडले आहेत. या ठिकाणी कमी ऑक्सिजन, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणातील बदल, धुळ, कीटक अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवणे गरजेचे आहे.