लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील बिघडलेल्या कचरा व्यवस्थापनामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करुन ते त्वरीत दुरुस्त करावे. प्रशासकीय काळातील ढिसाळ पद्धतीने झालेल्या या कामांची चौकशी करावी, कंत्राटदार एजन्सीला काळ्या यादीत टाकावे. आगामी काळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन याकामांसाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधीव्दारे केली आहे.
लातूर शहरातील बिघडलेल्या कचरा व्यवस्थापना संदर्भात गुरुवारी विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लक्षवेधी सुचना मांडून शासनाचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. या प्रसंगी बोलतांना आमदार अमित देशमुख म्हणाले की, राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशीक, ठाणे यासारख्या महानगरातही कच-याची समस्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र लातूरसारख्या लहानश्या शहरातही या संदर्भात गंभीर समस्या निर्माण व्हावी ही चिंतेची बाब आहे. सद्या लातूर शहरात सर्वत्र ठिकठिकाणी कच-याचे ढिग दिसत असून त्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरातील नागरीकांचे यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना वेळोवेळी सुचना देऊनही यात काहीही फरक पडतांना दिसत नाही. नागरीक स्वच्छता कर भरतात, शासन अनुदानही देते मात्र कचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित होत नाही ही बाब गंभीर आहे. लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम एकच कंत्राटदार मागच्या अनेक वर्षापासून करीत आहे. या कंत्राटदारा बद्दल पुर्वीही तक्रारी होत्या, मात्र मागच्या दोन-तीन वर्षाच्या प्रशासकांच्या कार्यकाळात शहरात कचरा व्यवस्थापन नावालाच उरले आहे.
या काळात या कंत्राटदाराला किती बीले मिळाली आणि त्या पैशाचा विनीयोग झाला का त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नवीन निवीदा निघाली असल्याचे शासनाच्या
वतीने सांगण्यात येत आहे. या नवीन निवीदेत पून्हा त्याच कंत्राटदाराला काम मिळणार की, त्याला काळया यादीत टाकले जाणार हा माझा प्रश्न असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे, अनेक ठिकाणी या कचरापासून खत, बायोगॅस आणिवीजनिर्मीती केली जात आहे. त्या पद्धतीचे नियोजन करुन लातूर शहर स्वच्छ, सुंदर ठेवणा-या एजन्सीला काम दिले जावे, अशी सुचनाही आमदार अमित देशमुख यांनी मांडली.