24.3 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीयचॅम्पियन्सचे जल्लोषी स्वागत

चॅम्पियन्सचे जल्लोषी स्वागत

पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईत, स्वागतासाठी अलोट गर्दी

मुंबई : प्रतिनिधी
अभूतपूर्व कामगिरी करून टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सकाळी मायदेशात परतला. प्रथम दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आणि मुंबई विमानतळावरच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान टीम इंडिची उघड्या बसमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मरिन ड्राईव्हवर लाखोंचा जनसागर उसळला होता. तसेच रस्त्याच्या दुतर्फा आणि वानखेडे स्टेडियमवरही तुफान गर्दी होती. लाखो क्रिकेट चाहत्यांच्या साक्षीने विश्वविजेत्यांचा १२५ कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या अनोख्या सन्मानाने भारतीय क्रिकेटपटू भारावून गेले.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम फेरीत गेल्या शनिवारी भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले. त्यानंतर बार्बोडोस येथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडियाचा मायदेशात येण्याचा प्रवास लांबला. आज पहाटे भारतीय संघ नवी दिल्लीत उतरला आणि त्यानंतर सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रथम पाण्याचा फवारा मारून सलामी देण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर टीम इंडियाचा थेट मरिन ड्राईव्ह येथून उघड्या बसने वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे मरिन ड्राईव्हपासून थेट वानखेडे स्टेडियमपर्यंत क्रिकेटप्रेमींनी दुतर्फा गर्दी केली होती. त्यामुळे वाहनांना वाट काढणेदेखील कठीण झाले होते. मरिन ड्राईव्हवर तर क्रिकेटप्रेमींचा महासागर उसळला होता. तसेच वानखेडे स्टेडियमही खचाखच भरले होते. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहोचताच एकच जल्लोष झाले. क्रिकेटपटूंनी मैदानात जल्लोष केला. त्यानंतर बीसीसीआयच्या वतीने सर्व खेळाडूंचा जंगी सत्कार करण्यात आला.
वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघ पोहोचण्यापूर्वीच जोरदार सेलिब्रेशन सुरू झाले. कारण चाहत्यांनी दुपारी २ वाजल्यापासून वानखेडे स्टेडियमच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. क्रिकेटप्रेमींना मोफत प्रवेश दिला गेला. वानखेडे स्टेडियमवर गर्दी एवढी वाढली की, त्यानंतर पोलिसांना वानखेडे स्टेडियमचे गेट बंद करावे लागले. त्यानंतर निराश झालेल्या चाहत्यांनी थेट मरिन ड्राइव्ह गाठले. त्यामुळे तेथेही अभूतपूर्व गर्दी झाली.

जयघोषाने स्टेडियम दणाणले
भारत माता की जय…. मुंबईचा राजा रोहित शर्मा….वंदे मातरम… या घोषणांनी वानखेडे स्टेडियम दणाणून गेले होते. आपल्या लाडक्या खेळाडूंसह वर्ल्ड कपला याची देही, याची डोळा पाहण्यासाठी चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम हाऊसफुल्ल करून सोडले होते. मुंबईत जोरदार पाऊस पडायला लागला होता. काही चाहत्यांना याचा अंदाज होताच. पण वानखेडेमधील ब-याच चाहत्यांनी यावेळी रेन डान्सचा अनुभव घेतला.

टीम इंडियाची ग्रँड एन्ट्री
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन टीम इंडिया विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरारष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. विमानाचे लँडिंग होताच चार गाड्या विमानाच्या समोरून पुढे धावल्या. त्यात मधल्या गाडीवर तिरंगा फडकत होता. त्यानंतर विमान थांबताच पाण्याच्या फवा-याने टीम इंडियाला सलामी दिली. तत्पूर्वी विमानातच केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात टीम इंडियाचे जंगी स्वागत करण्यात आले.

१५ मिनिटांत भरले वानखेडे स्टेडियम
आपल्या लाडक्या टीम इंडियाला पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमबाहेर तरुणाईने आलोट गर्दी केली होती. वानखेडे स्टेडियममध्येही नागरिकांना सोडण्यात आले. परंतु अवघ्या १५ मिनिटांत स्टेडियम भरले. त्यामुळे स्टेडियमचे दरवाजे बंद करावे लागले. धो-धो पाऊस आणि त्यात टीम इंडियाला पाहण्यासाठी भर पावसात जमलेली आलोट गर्दी संपूर्ण देशवासीयांचे लक्ष वेधून घेत होती.

मरिन ड्राईव्हवर
उसळला महासागर
मरिन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. जणू चाहत्यांचा महासागरच उलटला होता. माणसालाही चालता येणार नाही, अशी ही तोबा गर्दी पाहायला मिळाली. प्रचंड गर्दीत टीम इंडियाची विजयी मिरवणूक सुरू झाली. या विजयरथाने ओपन टॉप बसमधून वानखेडेच्या दिशेने कूच केली. मात्र, प्रचंड गर्दीमुळे विजयरथ बस गर्दीत अडकली. अशा स्थितीत पोलिस कर्मचा-यांना बसला वाट काढून देण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागली. त्याचवेळी पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. परंतु भर पावसातही मुंबईकरांनी मरिन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी केली होती.

वर्ल्डकप पाहून दिल्ली
विमानतळावर जल्लोष
टीम इंडियाचे गुरुवारी सकाळी ७ वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने विमानतळावरुन बाहेर पडताना चाहत्यांच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावून दाखवला. त्यावेळी वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR