जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला आहे. मनोज जरांगे पाटील शनिवार दि. ६ जुलैपासून घराबाहेर पडणार आहेत. यासाठी त्यांनी काही विशिष्ट मार्गही ठरवले आहेत. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडाव लागेल, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे हे मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहे. शनिवारी ६ जुलै ते १३ जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली काढणार आहे. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्याने घेतली जाणार आहे. या जनजागृती रॅलीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या ठिकाणी रॅली काढली जाणार आहे अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
कोणत्याही कार्यक्रमात बदल होणार नाही
जनजागृती रॅली हे शक्तिप्रदर्शन नाही. तसेच हा निवडणुकीचा विषय नाही. आम्ही आमच्या मागण्यासाठी एकत्र येत आहोत. सध्या कामाचे दिवस आहेत, मात्र जे आहेत ते समाज बांधव एकत्र येतील. कोणत्याही कार्यक्रमात बदल होणार नाही. ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.