टीम इंडियाला ११ कोटींची बक्षीस, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वालसह बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांचा आज विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे सरकारच्या वतीने गौरव करण्यात आला. एरवी धीरगंभीर भाषणे व चर्चा होणारा सेंट्रल हॉल रोहित, रोहितच्या घोषणांनी दुमदुमला. यावेळी रोहित शर्मा आणि सूर्यकुमारने मराठीत भाषण करत जोरात फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुक करताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले.
टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह त्याचे सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, प्रशिक्षक पारस म्हाब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. खचाखच भरलेले हे मध्यवर्ती सभागृह आज क्रिकेटच्या जल्लोषाने दणाणून गेले. भारतीय राष्ट्रध्वज उंचावून सभागृहात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणाही घुमल्या. …हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला या क्रिकेटमधीलच विक्रमादित्य लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाण्याने आणि हिंदी चित्रपट चक दे इंडिया..! च्या जल्लोषी सुरांनी सभागृह सुरवातीपासूनच निनादून गेले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह खेळाडूंचे वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफी, विधानमंडळाचे स्मृतीचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या समारंभास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, आमदार आशिष शेलार, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.
भारताची विजयी पताका
जगात फडकवली
विश्वविजेतेपद प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतिक आहे. या मुंबईकर खेळाडूंनी आपल्या नावाप्रमाणेच भारताची विजयी पताका जगात फडकवली आहे. त्यांनी यापुढेही भारतीयांना असाच आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळवून द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाचे कौतुक करताना राजकीय फटकेबाजीही केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक करताना अप्रत्यक्ष टोलेबाजी केली.
रोहित, सूर्यकुमारची
मराठीत फटकेबाजी !
यावेळी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.काल आम्ही मुंबईत जे अनुभवले ते सर्वांसाठीच एक स्वप्न होते. आमच्यासाठीही ते एक स्वप्न होते की वर्ल्डकप भारतात आणायचा आहे. हा कोणा एका खेळाडूचा नाही तर संघाचा विजय आहे. सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अफलातून झेलाचे कौतुक करताना ‘हातात बॉल बसला ते बरे झाले नाहीतर नाहीतर पुढे मीच त्याला बसवला असता’ अशी मिश्किल टिप्पणी रोहित शर्माने केली.