मुंबई : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने अनेक चित्रपट गाजवले. नाटकं गाजवलीत. खरेतर लक्ष्मीकांत बेर्डे हे निवेदिता यांचे बालपणीचे मित्र आहेत. बालरंगभूमीवर दोघांनी काम केले. पुढे ही जोडी अनेक चित्रपटात एकत्र झळकली. दरम्यान आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचे आज्जीबाई जोरात हे नाटक निवेदिता सराफ यांनी पाहिले आणि त्यांना लक्ष्याची आठवण आली. या नाटकाच्या निमित्ताने अभिनयचे कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
निवेदिता सराफ यांनी इंस्टाग्रामवर अभिनय बेर्डे सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, नुकताच आज्जीबाई जोरात हे नाटक बघायचा योग आला. नाटक खूप छान आहे. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर या सगळ्यांनी खूप छान कामे केली आहेत. लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनचे खूप कौतुक. पण सगळ्यात सुखद धक्का बसला अभिनय बेर्डेचं काम बघून. अप्रतिम काम केले आहे. त्याने माझ्या बालमित्राची आमच्या लक्षाची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच.
निवेदिता सराफ यांच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
या पोस्टवर आदिनाथ कोठारेने हार्ट इमोजी शेअर केली आहे. तर अभिनयने निवेदिता सराफ यांचे आभार मानलेत. त्याने म्हटले की, मी खूप आभारी आहे. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. अभिनय बेर्डेने आज्जीबाई जोरात या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले आहे. त्याला घरातूनतच अभिनयाचे बाळकडू मिळाले आहे. अभिनयची आई प्रिया बेर्डे यादेखील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनयने ती सध्या काय करते या सिनेमातून मराठी कलाविश्वात पाऊल टाकले. याशिवाय तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन रे कस्तुरी’, ‘रंपाट’, ‘बांबू’, ‘बॉइज ४’ या सिनेमांमध्ये झळकला आहे.