सावरगाव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथील तरुण शेतकरी राम जनार्धन बोबडे (वय ३९) वर्ष यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन तसेच शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला दूध व्यवसाय तोट्यात येत असल्यामुळे नैराश्यातून शेतातील पत्र्याच्या शेडमधे गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
जळकोटवाडी येथील राम बोबडे यांनी कर्ज घेऊन शेतात लाखो रुपये खर्च करून काकडीचे पीक घेतले होते. त्यात काकडीला दर न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. दुग्ध व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि नफा याचा ताळमेळ न लागल्याने शेती व्यवसायासाठी घेतलेले कर्ज वाढत असल्याने आर्थिक संकटाला कंटाळून त्यांनी स्व:ताच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आडुला गळफास लावुन आत्महत्या केली. मयत शेतकरी राम बोबडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतकरी आत्महत्या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी जाऊन तामलवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार राजेंद्र चौगुले, विक्रम सावंत यांनी घटनास्थळ पंचनामा केला. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.