23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका

मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका

नागपूरहून मुंबईला येणा-या अनेकांचा विमानतळावरच मुक्काम

मुंबई : मुंबई आणि मुंबई उपनगरासह राज्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. एकट्या मुंबईत अवघ्या सहा तासांमध्ये झालेल्या तब्बल ३०० मिलिमीटर पावसाने मुंबई शहराची घडी विस्कटून टाकली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

पुढील काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. अशातच या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. नागपूर ते मुंबई हवाई वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. परिणामी, विधिमंडळाच्या कामकाजाला विदर्भातून मुंबईकडे जाणा-या अनेक आमदार नागपूर विमानतळावर अडकून पडले आहेत. यात आमदार अशोक धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार सुधाकर अडबोले, आमदार रवी राणा, आमदार रवींद्र भुयार, केंद्रीय राज्य रक्षा मंत्री रक्षा खडसे, असे अनेक आमदार आणि नेते नागपूर विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे जोपर्यंत पावसाचे विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित होत नाही तोपर्यंत विमान वाहतूक सेवा पूर्ववत होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज देखील एक वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

अनेक विमाने अन्यत्र वळवली
राज्यात काल रात्रीपासून कोसळणा-या पावसाच्या सतत धारेने जनजीवन अक्षरश: विस्कळीत केले आहे. परिणामी त्याचा फटका रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक पाठोपाठ हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. मुंबई विमानतळावर अनेक हवाई उड्डाणे उशिरा होत आहेत. अनेक विमान मुंबई विमानतळावरून अन्यत्र वळवण्यात आली आहे. अहमदाबाद हैदराबाद कडे जाणारी विमान मुंबई विमानतळावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे या हवाई वाहतुकीचा फटका प्रवाशांना बसला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसालाच पावसामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

समुद्रात भरती
मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात भरती आहे. यावेळी समुद्रात ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुस-या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR