श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरू असलेल्या चकमकीचा गुरुवारी दुसरा दिवस आहे. या भागात अजूनही चकमक सुरूच आहे. दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत तर लष्कराच्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला आहे. या भागात उपस्थित असलेल्या इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करही विशेष मोहीम राबवत आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
दहशतवादी बुधवारपासून राजौरीतील कालाकोट भागातील जंगलात लपून बसले असून येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. बुधवारी दहशतवाद्यांशी आमने-सामने चकमक झाली. दहशतवादी येथे महिनाभरापासून लपून बसले होते. रात्री गोळीबार थांबला होता पण गुरुवारी सकाळपासून चकमक पुन्हा सुरू झाली आहे.
या कारवाईदरम्यान या भागात राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराला सुरवातीला अडचणींचा सामना करावा लागला. डोंगराजवळील ढोकमध्ये राहणारे सामान्य लोक, विशेषत: महिला आणि लहान मुले यांना दहशतवाद्यांच्या गोळीबाराचा फटका बसण्याची शक्यता आहे, म्हणून लष्कराला त्यांच्या ऑपरेशन दरम्यान त्यांची सुरक्षा सुनिश्चित करायची आहे.
तसेच या परिसराची भौगोलिक स्थितीही अवघड आहे. याठिकाणी रोड कनेक्टिव्हिटी कमी असल्याने ऑपरेशनमध्ये अडचण निर्माण होत आहे. दहशतवादी लष्कराच्या कारवाईला प्रत्युत्तर देत असून सातत्याने गोळीबार करत आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचे स्पष्ट होत आहे.