कोल्हापूर : लंडनमधील व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट म्युझियममधून भारतात वाघनखं आणली जाणार आहेत. परंतु ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत केला आहे. यासंदर्भात म्युझियमकडून पत्र मिळाले असून शासनातील संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यानंतर आता कोल्हापुरात आंदोलन झाले असून बिंदू चौकात एकत्र येत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. वाघनख्यांसंदर्भात सभागृहात खोटी माहिती दिल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. खोटी माहिती देऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार शिवप्रेमींची दिशाभूल करत असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची नसलेली वाघनखं महाराष्ट्रात आणणा-या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार हे खोटी वाघनखे लंडनहून महाराष्ट्रात आणू पाहत आहेत. याच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आला आहे.
यावेळी प्रतिकात्मक वाघनखे आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोला फुल्या मारून निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. जी वाघनखे शिवाजी महाराज यांनी वापरलेली नाहीत, ती वाघ नखे शिवप्रेमींची दिशाभूल करण्यासाठी जर कोल्हापुरात आणली, तर आपण तो कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. जर ही खोटी वाघनखे कोल्हापुरात प्रदर्शनाला ठेवली तर मोठा संघर्ष निर्माण होईल असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे.