नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरुन पुन्हा एकदा भाजपशासित केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला. चुकीच्या प्रकरणामध्ये अरंिवद केजरीवाल यांना गोवले असून सरकार त्यांचा छळ करत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.
पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना संजय सिंह म्हणाले की, २१ मार्चपासून आतापर्यंत केजरीवाल यांचे वजन साडेआठ किलोने कमी झाले आहे. ७० किलो असलेले वजन ६१.५ किलोच्या आसपास झाले आहे. हे वजन नेमके कमी का होत आहे, याबाबत काहीही माहिती नाही. संजय सिंह म्हणाले की, पाच वेळा रात्री अचानक केजरीवालांची शुगर लेव्हर ५० वरुनही खाली आली. ही एक गंभीर बाब आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीमध्ये कुणी कोमामध्येही जाऊ शकते. रात्रीच्या वेळी जेलमध्ये डॉक्टरही नसल्याचे सिंह यांनी सांगितले. संजय सिंह पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना जेलमधून बाहेर काढून त्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. परंतु केंद्र सरकार त्यांना जेलमधून बाहेर येऊ देत नाही. अशातच त्यांच्यासोबत कधीही होत्याचे नव्हते होऊ शकते.
एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये संजय सिंह म्हणाले, भाजप सरकारकडून २५ जून रोजी संविधान हत्येचा दिवस पाळला जाणार असेल तर मग ३० जानेवारी हा दिवस, ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली होती तो दिवसही आणि तो प्रत्येक दिवस संविधान हत्येचा दिवस पाळला पाहिजे, जेव्हा भाजपने अनेक राज्यांमधले सरकारं पाडले होते.