सोलापूर : घरातील व्यक्ती आजारी असल्याने त्या व्यक्तीला उपचारासाठी सिव्हिलमध्ये अॅडमिट केले जाते. रात्रंदिवस नातेवाईक आपला पेशंट कधी बरा होतो या विवंचनेत असताना दुसरीकडे मात्र त्या नातेवाईकाची दुचाकी चोरीला जाते. असे प्रकार सिव्हिलमध्ये सातत्याने घडत असल्याने नातेवाईकांवर दुहेरी दुःख ओढावत आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार अर्थात सिव्हिल रुग्णालयात सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर परजिल्ह्यांतूनही रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सध्याच्या घडीला परवडणारे नसल्यामुळे सर्वसामान्य लोक सिव्हिलमध्येच उपचारास पसंती देतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला चार ते पाच दिवस सिव्हिलमध्ये अॅडमिट केले जाते. या रुग्णासोचत असलेले नातेवाईक कुठे व्हरांड्यात, तर कधी सिव्हिलच्या बाहेर रात्र काढतात. रुग्ण जर सिरिअस असेल तर नातेवाईक काळजीत पडलेले असतात. खासगी रुग्णालयात न्यावे तर बिल भरमसाट येणार. एवढे पैसे आणायचे कुठून, या चिंतेत नातेवाईक असतात. अशातच त्यांची दुचाकी सिव्हिलच्या परिसरामधून चोरीला गेल्याचे त्यांना समजते.
तेव्हा आणखीनच मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचून जाण्याची वेळ नातेवाईकांवर येते. असाच प्रसंग शहरातील संतोष सूर्यकांत बिराजदार यांच्याबाबत घडला आहे. ते पेशाने शिक्षक आहेत. अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी गावातील श्री मलकारसिध्द हायस्कूल येथे शिक्षक आहेत. त्यांचे सहकारी गेनसिध्द सोमना पुजारी यांची मुलगी सिव्हिल हॉस्पिटल येथे ‘बी’ ब्लॉक येथे अॅडमिट आहे. तिचा जेवणाचा डबा दररोज घेऊन येत होतो. पण, सहा जुलै रोजी हॉटेलच्या बाजूला लावलेली गाडी चोरुन नेल्याची घटना घडली.
गेनसिद्ध सोमत्रा पुजारी यांची मुलगी सिव्हिलमध्ये ‘बी’ ब्लॉक येथे अॅडमिट आहे. मी हालचिचोंळी गावातून तिच्या जेवणाचा डबा घेऊन आलो होतो. दुचाकी ‘बी’ ब्लॉकजवळ उभी केली होती. चोरट्याने दिवसाढवळ्या माझी दुचाकी चोरून नेली. एक तर मुलगी आजारी असल्यामुळे चिंतेत आहे आणि आता मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे रामवाडी परीसरातील भूषणनगर येथील संतोष बिराजदार यांनी सांगीतले.
खिशात पैसे नाहीत म्हणून रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल केलेले असते. असे असताना आता दुचाकी चोरीला गेल्याने दुहेरी दुःख त्यांच्यावर ओढावतेय. त्याचे कारण जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरुन सातत्याने दुचाकी चोरीला जात आहेत.सिव्हिल शासकीय रुग्णालयासमोर सीसीटीव्ही बसविण्यात आले. याठिकाणाहून सातत्याने दुचाकी चोरीला जात आहेत. पोलिसांकडून या चोरीचा जेव्हा तपास सुरू होतो तेव्हा सीसीटीव्हीत काहीच दिसत नसल्याचे पोलिस सांगतात. चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही याठिकाणी बसवावेत, असे पोलिस सांगत आहेत.