सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला होणाऱ्या अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे – मिरज-पुणे आषाढी विशेष डेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
दरम्यान, पुणे – मिरज-पुणे आषाढी विशेष डेमू ट्रेन एकूण १२ फेऱ्या करणार आहे. १५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत ही ट्रेन दररोज पुणे रेल्वे स्थानकाहून सकाळी ८:३० वा निघणार आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:१५ वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. त्यानंतर मिरज-पुणे विशेष डेमू ट्रेन ही मिरज रेल्वे स्थानकाहून सायंकाळी ४:४५ वाजत निघणार आणि त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावन पोहचणार आहे. या गाडीला हडपसर दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडनिंब पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ सलगरे, अरग आणि मिरज असणार आहेत. ही गाडी दहा डब्याची असणार आहे.
तरी आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांनी वरील विशेष डेमू ट्रेनचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आषाढीसाठी रेल्वे प्रशासनाने ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली आहे याशिवाय वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे.