जयपूर : राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार गुरुवारी (२३ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजता थंडावणार आहे. त्यानंतर कुठेही रोड शो, मिरवणूक, रॅली, सभा इत्यादी आयोजित करण्यास परवानगी मिळणार नाही. कोणताही उमेदवार प्रचार करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. आज (२३ नोव्हेंबर) निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसने आपली पूर्ण ताकद लावली आहे. दोन्ही पक्षातील अनेक बडे नेते गुरुवारी राजस्थानमध्ये येऊन जाहीर सभा आणि रॅलींना संबोधित केले आहे. राज्यात आज नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे असे अनेक बडे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार केला आहे.
काँग्रेसनेही निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपले बडे नेते मैदानात उतरवले आहेत. पक्षाच्या बाजूने राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी आणि इतर अनेक बडे नेते रॅली, जाहीर सभा आणि रोड शोद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तसेच पंतप्रधान आज राजस्थानमध्ये तीन कार्यक्रमांना उपस्थित होते. दुपारी साडेबारा वाजता त्यांनी देवगडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यानंतर ते श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिरात दर्शन आणि पूजा करण्यासाठी दुपारी ४ वाजता मथुरेला पोहचले. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मोदी दुपारी साडेचार वाजता संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते.