28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रखेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक

खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक

मसुरीत परत बोलावले, २३ जुलैपूर्वी हजर राहण्याचा आदेश
मुंबई : प्रतिनिधी
दृष्टीदोष, मानसिक आजारासह बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएस झालेल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका बसला आहे. कारण त्यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावण्याचा निर्णय मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमीने घेतला. महाराष्ट्रातील प्रशिक्षण सोडून २३ जुलैपूर्वी मसुरीत हजर राहण्याचे आदेश लालबहादूर शास्त्री अकादमीने दिले. तुमच्यावरच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी मसुरीत यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले. त्यांच्याकडून अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा तेथील अधिकारी प्रयत्न करणार आहेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी म्हणून नियुक्तीस होत्या. मात्र, त्यांच्या अनेक कारनाम्यांमुळे त्या वादात अडकल्या. त्यानंतर राज्य सरकारने त्यांची वाशिम आणि अकोला जिल्ह्यात बदली केली. सनदी अधिकारीपदी निवड होण्यासाठी त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अँटी चेंबर मिळवण्यासाठी केलेली कृती, त्यांच्या वडिलांकडून अधिका-यांवर टाकण्यात आलेला दबाव, आई मनोरमा यांचे मुळशी येथील पिस्तूल प्रकरण, ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, खासगी कारवर लावलेला अंबर दिवा आणि दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर बाबी यांचा अहवालात समावेश असेल.

प्रमाणपत्रांची होणार चौकशी
पूजा खेडकर यांनी सादर केलेले प्रमाणपत्र कोणी दिले, कोणत्या जिल्ह्यातून मिळवले आणि त्यांची वैद्यकीय तपासणी कोणत्या डॉक्टर व रुग्णालयातून झाली, या बाबी देखील तपासल्या जाणार आहेत. खेडकर यांनी दृष्टीदोष, मानसिक आजारासह अन्य एका प्रवर्गातील दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले असल्याची चर्चा आहे.

चौकशी समितीसमोर
म्हणणे मांडणार
केंद्र सरकारच्या चौकशी समितीसमोर माझे म्हणणे मांडेन, असे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी स्पष्ट केले. वाशीम येथील नियोजन भवन परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR