23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रविशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड्यंत्र

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड्यंत्र

मुंबई : प्रतिनिधी
राजर्षि शाहू महाराज यांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात. पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे.
विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

विशाळगड प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या घरांची, दुकानांची व मालमत्तांचे प्रचंड नुकसान करण्यात आले. झुंडशाहीचा हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, या दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत

विशाळगड प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्र ही साधू-संतांची, थोर पुरुषांची, विचारवंत व समाजसुधारकांची भूमी आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा आहे, असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत याबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड-किल्ल्यांचा वारसा जपला पाहिजे. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे, न्यायालयातील सुनावणीवेळी सरकारी वकील उपस्थित नसतात, सरकार पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असताना अचानक अशा काही हालचाली करून अतिक्रमणाचा मुद्दा चव्हाट्यावर आणला गेला. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली १४ तारखेला विशाळगडापासून ४ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावातील एका धर्माच्या लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, मारहाण करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. विशाळगडावरील अतिक्रमण व गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय आहेत, असे नाना पटोले यांनी या पत्रातून सांगितले आहे.

प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा
या प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी केलेले विधान राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वा दंगेखोरांवर कारवाई करण्यासंदर्भातील नसून विशिष्ट धर्माला भीती घालण्याचे व या प्रकरणाला वेगळा रंग देणारे आहे, गृहमंत्र्यांचे विधान हे एकप्रकारे दंगेखोरांना पाठीशी घालणारे आहे, आम्ही या विधानाचाही निषेध करतो. १४ जुलै रोजी जो हिंसाचार झाला ते सरकार आणि प्रशासनाचे फक्त अपयशच नाही तर प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे, अशी टीका नाना पटोलेंनी पत्रातून केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR