24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूकंप वैज्ञानिक वेधशाळा होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूकंप वैज्ञानिक वेधशाळा होणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागासाठी कायमस्वरूपी भूकंप वैज्ञानिक वेधशाळा उभारण्यात येणार असून केंद्र शासनाच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तळमजल्यावर १२ फूट बाय १० फूट आकाराची जागा मागितली आहे. वाहनांच्या वर्दळीपासून शांत अशा ठिकाणी ही जागा मिळावी, यासाठी नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीचे (एनएससी) शास्त्रज्ञ रविकांत सिंह यांनी जिल्हा प्रशासनाला नुकतेच पत्र पाठविले आहे. ट्रॅफिक, हाय-टेन्शन पॉवर लाइन्स, रेल्वे ट्रॅक, जड उद्योग युनिट्स, पॉवर जनरेटर नसलेली जागा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे पत्रातून करण्यात आली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ही केंद्र शासनाची नोडल एजन्सी असून देशभरात भूकंपाच्या धक्क्यांचे चोवीस तास निरीक्षण करते. शास्त्रीयदृष्ट्या भूकंपाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रात मोक्याच्या ठिकाणी चार मानवरहित भूकंप वैज्ञानिक वेधशाळा स्थापन करण्याची योजना एनएससीने आखली आहे; त्यापैकी एक वेधशाळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. भूकंपविषयक वेधशाळा उभारण्यासाठी तांत्रिक आवश्यकतांमध्ये तळमजल्यावर विद्यमान इमारतीमध्ये विद्युतपुरवठा व इतर मूलभूत सुविधांसह १२० फूट आकाराची जागा मागितली आहे.

मिळणा-या जागेत ३ बाय ४ फूट आकाराचा काँक्रीटचा खांब जमिनीच्या खाली सुमारे १० फूट बांधला जाईल. त्याच्या वरच्या बाजूला सेन्सर्स असतील. टेरेसवर सौर पॅनेल बसविण्यात येतील. जागा देण्याचे निश्चित झाल्यानंतर एनएससीचे पथक पाहणी करतील. त्यात भूकंपाची माहिती देणारी महागडे उपकरणे असतील. त्यासाठी सुरक्षाव्यवस्था देण्यात येईल. त्या देखभालीचा खर्च एनएनसी उचलेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR