कदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ज्वर शिगेला पोहोचला होता. भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून ओळखला जातो. टी-२०सारखा झटपट क्रिकेटचा आविष्कार उदयास आल्यानंतर भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाला अधिकच उधाण आलेले दिसून आले. इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता त्या काळातही कसोटी सामने, एकदिवसीय सामने टीव्हीच्या पडद्यावर रात्री जागून पाहणा-यांची संख्या भारतात मोठी होती. या क्रिकेटप्रेमाची रुपेरी पडद्याला भुरळ पडली नसती तरच नवल ! हिंदी चित्रपटांचा इतिहास पाहिल्यास क्रीडाविश्वावर आधारित अन्य चित्रपटांच्या तुलनेत क्रिकेटवर बनवलेल्या चित्रपटांची संख्या सर्वाधिक आहे. यातील बरेचसे चित्रपट हे क्रिकेटच्या महान खेळाडूंचे जीवनपट आहेत. याशिवाय क्रिकेटच्या काल्पनिक कथांवर आधारित चित्रपटही बनवले गेले. क्रिकेटवर बनलेल्या चित्रपटांचीही सर्वाधिक चर्चा होते. क्रिकेटच्या थीमवर बनलेल्या ‘लगान’ या सुपरहिट चित्रपटाचे कथानकही काल्पनिक होते.
खरे तर चित्रपट आणि क्रिकेट यांचे नाते अनेक दशके जुने आहे. भारतात क्रिकेट या खेळाची आवड इतकी आहे की आपल्याकडील अनेक जण परदेशात जाऊन भारतीय संघाला सपोर्ट करतात. या खेळाने समाजातील भेदाभेदाची दरी दूर करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. कारण प्रत्येक जाती- धर्माचे खेळाडू क्रिकेट खेळतात आणि पाहतातही! त्यामुळेच क्रिकेटवर अनेक चित्रपट बनले आणि बनवले जात आहेत. १९५९ पासून आतापर्यंत क्रिकेटवर आधारित सुमारे तीन डझन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी ‘लगान’, ‘जन्नत’ आणि धोनीचा बायोपिक हे तीन चित्रपट सुपरहिट ठरले. तर काई पो चे, सचिन, फेरारी की सवारी आणि ‘८३’ यांनाही पसंती मिळाली. त्याच वेळी यापैकी अर्धा डझन चित्रपट जेमतेम आपला खर्च वसूल करू शकले आणि उर्वरित चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले. पडद्यावरची क्रिकेटची आवड अजूनही थंडावलेली नाही. आज २०२३ मध्ये क्रिकेट अथवा क्रिकेटपटूंवर आधारित जवळपास अर्धा डझन चित्रपट रांगेत आहेत. केवळ पुरुष क्रिकेटपटूंवरच बायोपिक बनवले गेले नाहीत तर तापसी पन्नूने भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित ‘शाबास मिठू’ चित्रपटात भूमिका साकारली होती.
१९५९ मध्ये पहिला चित्रपट
१९५९ मध्ये क्रिकेटच्या कथेवर आलेला ‘लव्ह मॅरेज’ हा या श्रेणीतील पहिला चित्रपट मानला जातो. देव आनंद आणि माला सिन्हा यांनी या चित्रपटात अभिनय केला होता. यामध्ये देव आनंद यांनी क्रिकेटरची भूमिका साकारली असून क्रिकेटमुळेच माला सिन्हा त्याच्या प्रेमात पडते, असे कथानक आहे. यानंतरच्या काळात डझनभर चित्रपट बनले आणि बनत राहिले. पण, २००१ मध्ये रिलीज झालेला आमिर खानचा ‘लगान’ हा क्रिकेटवर आधारित चित्रपटांमध्ये माईलस्टोन ठरला. हा चित्रपट व्हिक्टोरियन युगावर केंद्रित आहे ज्यामध्ये क्रिकेटला राष्ट्रवादाशी जोडले गेले होते. ‘मदर इंडिया’ आणि ‘सलाम बॉम्बे’ नंतर ऑस्करसाठी नामांकन मिळालेला ‘लगान’ हा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे! २०१६ मध्ये आलेला ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक आहे. क्रिकेटवर बनलेला हा दुसरा सर्वांत यशस्वी चित्रपट मानला जातो. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाला अफाट लोकप्रियताही लाभली आणि तिकिटबारीवरही त्याने चांगला व्यवसाय केला.
क्रिकेटपटूंवर बनवलेला बायोपिक
क्रिकेटच्या लोकप्रियतेमध्ये सर्वांत मोठे योगदान त्या खेळाडूंचे आहे, ज्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळेच या महान खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट बनवले गेले. यामध्ये केवळ त्यांचा खेळच चित्रित केला गेला नाही तर खेळाची उंची गाठण्यासाठी केलेली त्यांची धडपडही दाखवण्यात आली. उदाहरणार्थ, महेंद्रसिंग धोनीवर बनलेल्या चित्रपटात त्याचा संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्य खूप छान दाखवण्यात आले होते. २०२१ मध्ये रिलीज झालेला कपिल देव यांचा बायोपिक ‘८३’ ही त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात कपिल देवची कर्णधारपदाची रणनीती आणि १९८३ चा विश्वचषक विजय दाखवण्यात आला होता. पण, मोहम्मद अझरूद्दीनवर आधारित ‘अझहर’ (२०१६) हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता. हा चित्रपट अझरूद्दीनच्या जीवनावर आधारित होता, ज्याच्यावर मॅच फिक्सिंग करून टीम इंडियाचा पराभव केल्याचा आरोप होता. महान फलंदाज सचिन तेंडुलकरवर बायोपिकही बनवण्यात आला होता, ज्याचे नाव होते ‘सचिन द बिलियन ड्रीम’. सचिनला क्रिकेटमधील देव मानले जात असूनही हा चित्रपट तिकिटबारीवर चालला नाही! खरंतर हा फीचर फिल्म नसून डॉक्युमेंट्री होती. आता येत्या काळात महान क्रिकेटर लाला अमरनाथ यांच्यावरही बायोपिक बनणार आहे. याशिवाय सौरव गांगुलीच्या बायोपिकचे कामही सध्या सुरू आहे.
क्रिकेट चित्रपटांचे काल्पनिक कथानक
केवळ बायोपिकच नाही तर काल्पनिक क्रिकेटच्या कथाही प्रेक्षकांना खूप आवडल्या. १९८४ मध्ये रिलीज झालेल्या ‘ऑलराऊंडर’ची कथा अजय नावाच्या पात्रावर आधारित होती, ज्याची त्याच्या मोठ्या भावामुळे भारतीय कसोटी संघात निवड होते. याला देशातील पहिल्या पूर्णपणे क्रिकेटवर आधारित चित्रपटाचा दर्जा मिळाला आहे. भारतीय संघाने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला, त्यानंतर १९८४ मध्ये ‘ऑलराऊंडर’ रिलीज झाला. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा चित्रपट ‘जर्सी’ हा साऊथ चित्रपटाचा रिमेक होता. यामधील नायक क्रिकेटरच्या भूमिकेत दिसला होता. याचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले होते. या चित्रपटाला चांगले रिव् ू मिळाले पण तो फ्लॉप ठरला. २००५ मध्ये आलेला ‘इकबाल’ हा चित्रपट एका मूकबधिर खेड्यातील मुलाची कथा आहे,
ज्याचा उद्देश वेगवान गोलंदाज बनणे आणि क्रिकेट संघासाठी खेळणे असतोे. या चित्रपटात नसिरुद्दीन शहा एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले. ते इकबालला म्हणजेच श्रेयस तळपदेला त्याच्या क्रिकेट प्रवासात मदत करतात. या क्रीडा चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘पटियाला हाऊस’ हा २०११ साली प्रदर्शित झालेला क्रिकेट ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये शॉन टेट, अँड्र्यू सायमंड्स, हर्शेल गिब्ज, किरॉन पोलार्ड, नासिर हुसैन आणि संजय मांजरेकर यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी काम केले होते. या चित्रपटाच्या कथेत अक्षय कुमारने एका ब्रिटिश भारतीयाची भूमिका साकारली होती. ‘काय पो चे’ या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने पहिल्यांदा काम केले होते. त्यात तीन मित्रांची कहाणी दाखवली होती. ‘फेरारी की सवारी’ (२०१२) देखील क्रिकेटच्या क्रेझवर आधारित होता. यामध्ये शर्मन जोशी मुख्य भूमिकेत होता. आता तर ओटीटीवरही क्रिकेटच्या कथांचे भांडवल केले जात आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ हा असाच एक चित्रपट आहे.
१९५९ मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह मॅरेज’मध्ये देव आनंद आणि माला सिन्हा होते. कुमार गौरव आणि रती अग्निहोत्री यांनी १९८४ च्या ‘ऑलराऊंडर’मध्ये काम केले होते. १९९० मध्ये आलेल्या ‘अव्वल नंबर’ चित्रपटात देव आनंद, आमिर खान आणि आदित्य पांचोली हे कलाकार होते. रिमी सेन आणि कुणाल कपूर यांनी २००७ मध्ये आलेल्या ‘हॅटट्रिक’ चित्रपटात काम केले होते. २००८ मध्ये रिलीज झालेला ‘जन्नत’ हा इम्रान हाश्मी आणि सोनल चौहान अभिनित चित्रपट होता. तर २००९ मध्ये आलेल्या ‘दिल बोले हडिप्पा’ चित्रपटात राणी मुखर्जी आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होते. २०११ मध्ये आलेल्या ‘पटियाला हाऊस’ चित्रपटात अक्षय कुमार, ऋषी कपूर, डिंपल कपाडिया आणि अनुष्का शर्मा होते. शरमन जोशी आणि बोम्मन इराणी यांनी २०१२ मध्ये आलेल्या ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटात काम केले होते. २०१६ मध्ये आलेल्या ‘अजहर’ चित्रपटात इम्रान हाश्मीने मुख्य भूमिका साकारली होती. २०१६ मध्ये रिलीज झालेला ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट होता. रणवीर सिंगने २०२१ च्या ‘८३’ मध्ये काम केले होते.
– सोनम परब