18.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहैतीच्या किना-यावर बोटीला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

हैतीच्या किना-यावर बोटीला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्र : हैतीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर एका बोटीला आग लागल्याने किमान ४० स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) च्या हवाल्याने संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेसचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी शुक्रवारी एका निवेदनामध्ये सांगितले की, हैतीच्या राष्ट्रीय स्थलांतर कार्यालयानुसार, ८० हून अधिक लोकांना घेऊन जाणारी बोट दोन दिवसांपूर्वी लबाडीहून निघाली होती. मात्र उत्तर हैतीमधील कॅप हैतीनच्या किना-याजवळ त्यांच्या बोटीला आग लागल्याने किमान ४० स्थलांतरितांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर हैतीयन कोस्ट गार्डने बोटीवरील ४१ जणांची सुटका केली असून त्यांना अधिका-यांच्या सहकार्याने आयओएमद्वारे वैद्यकीय सेवा, अन्न, पाणी आणि मानसशास्त्रीय आधार दिला जात आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. अकरा जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हैतीमधील आयओएमचे प्रमुख ग्रेगोइर गुडस्टीन म्हणाले की, अशा घटना टाळण्यासाठी स्थलांतरासाठी सुरक्षित मार्गांची गरज आहे. आयओएमच्या म्हणण्यानुसार, या वर्षी शेजारच्या देशांनी ८६,००० हून अधिक स्थलांतरितांना जबरदस्तीने हैतीमध्ये परत पाठवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR