मुंबई : इथले लोक आम्हाला मते देत नाहीत. तुम्हीच लोक आहात जे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला जिंकवता. माझ्यासोबत राहा, कुणी माई का लाल मुंबईत तुमच्या केसांना धक्का लावू शकत नाही. उत्तर भारतीयांच्या नादाला लागू नका, जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत ठीक अन्यथा उचलून बत्तीशी बाहेर काढू असा इशारा देत समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
समाजवादी पक्षाच्या नवनियुक्त ३६ खासदारांचा मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अबु आझमींनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवर होणा-या हल्ल्यावर भाष्य केले. अबु आझमी म्हणाले की, जेव्हा उत्तर भारतीयांवर अन्याय होतो तेव्हा कोण उभा राहतो? आम्हाला सरकार सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देते. मी तर केवळ लाठी मागितली होती. मारू नका पण मारही खावू नका असे म्हटले. तेव्हा माझ्यावर गुन्हे दाखल झाले. तो बोलला तलवार वाटू पण मर्दांसमोर तलवारीचे महत्त्व काय, ही काठी गांधींची आहे जी भल्याभल्यांना ठीक करते असे त्यांनी म्हटले.
त्याशिवाय आता निवडणुका होणार आहेत. माझा टॅम्पो हाय आहे, यंदा जबरदस्त निवडणूक लढणार आहोत. समाजवादी पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवायचा आहे. माझ्यासोबत राहा, जेव्हा आमच्या लोकांवर हल्ला केला जातो. तेव्हा कुणी तुमच्या मदतीला आले नाही. मी त्या व्यक्तीचे नाव घेऊन तोंड खराब करू इच्छित नाही. त्याने किती उत्तर भारतीयांना मारलं, दुकाने फोडली, हत्याही झाली मात्र तो कधी जेलला गेला का, एकदा मला गृहमंत्री बनवा, एकदा बनलो ना अनेकांना त्यांची नानी आठवेल असे सांगत आझमींनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.