नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या २४ तासात विशेषत: पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. सर्वत्र, सर्वदूर संततधार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दोन तरुण नाल्याच्या पुरात वाहून गेले. गडचिरोली जिल्ह्यात २७ रस्ते पाण्याखाली असून भामरागडसह शेकडो गावाचा संपर्क तुटला. नागपूर शहरात पहाटेपासून ६ तासांत २१७ मि.मी. पाऊस झाला असून शेकडो वस्त्या जलमय झाल्या. भंडारा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून गोसीखुर्दसह सर्व प्रमुख धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याला शुक्रवारपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. शनिवारी सकाळपर्यंत ब्रम्हपुरी येथे तब्बल १८९ मि.मी. पाऊस झाला. नागभिड तालुक्यात विलम नाल्यात एक व बोथली नाल्यात एक असे दोन तरुण वाहून गेले. ऋणाल प्रमोद बावणे (११) व स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) असे मृतकांची नावे आहेत. इतर नालेही ओव्हरफ्लो झाले आहेत. १०० च्यावर घरांची पडझड झाली असून पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली. गडचिरोली जिल्ह्यातही ४० पैकी २३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून ठिकठिकाणी नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहराला जोडणारे २७ रस्ते पाण्याखाली गेले असून भामरागड शहरासह शेकडो गावांचे संपर्क तुटले आहेत.
नागपूर शहरात या मोसमात पहिल्यांदा पावसाचा तडाखा बसला. सकाळी ५.३० वाजतापासून १२ वाजतापर्यंत तब्बल २१७.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे शहरातील ५०० च्यावर वस्त्या जलमय झाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी पुरात अडकलेल्या १०० पेक्षा अधिक नागरिकांना प्रशासनाच्या टीमने सुरक्षितपणे बाहेर काढले. शहराला जोडणारे काही तालुक्याचे मार्गही बंद पडले होते. दुसरीकडे भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा तडाखा बसला. यादरम्यान भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे ३० दरवाजे, चंद्रपूरच्या ईरई धरणाचे ७ दरवाजे, गोंदिया जिल्ह्यात पुजारीटोला धरणाचे सर्व ११ दरवाजे तसेच वर्धा जिल्ह्यात नांद धरणाचे ७ व लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे सुरक्षेच्या दृष्टीने उघडण्यात आले आहेत.