चंद्रपूर : प्रतिनिधी
मधल्या काळात पावसाने दांडी मारल्याने विदर्भातील शेतक-यांची चिंता वाढवली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भाला अक्षरश: झोडपून काढले आहे. सध्या पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुंवाधार पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील रस्त्यांना नदी- नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात या पावसाने कहर केल्याचे बघायला मिळाले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे १०० ते १५० घरांमध्ये पाणी शिरले आहे. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने गावतलावातील पाण्यात मोठी वाढ झाली. दरम्यान आज पहाटे तलावाची पाळ फुटून गावात पाणी शिरले आहे. परिणामी गावातील ग्रामस्थांचे धान्य आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच गावातील जवळपास १०० बक-या आणि इतर जनावरे देखील या पुरात दगावले आहेत.
अनेक घरे पाण्याखाली, शेकडो जनावरे दगावली
उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना शनिवारच्या सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसाने धो-धो धुतलंय. दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.
अचानक आलेल्या या पाण्यामुळे शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. यात अनेक जनावरे देखील दगावली आहेत. तर शेतक-यांनी शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणेही पाण्यात भिजले आहे. एकुणात शेतक-यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि वित्त हानी झाल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्र्यांचे सर्व यंत्रणेला आदेश
महाराष्ट्रात पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली आहे. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा आदेश यावेळी देण्यात आला आहे.
अंधारी नदीच्या पुरात नागरिक अडकले
चंद्रपूरमधील अंधारी नदीच्या पुरामुळे शेतात अडकलेल्या २५ लोकांना रेस्क्यू करून काढण्यात आले. पोलिसांच्या रेस्क्यू टीमने पुराच्या पाण्यातून अजयपूर, हळदी, पिंपळखुट या भागातील लोकांना काढले. ते शेतात गेले होते. परंतु नदीला आलेल्या पुरामुळे अडकले होते. तसेच पिंपळखुट येथील रेड अर्थ रिसॉर्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गडचिरोलीचा संपर्क तुटला
नागपूर पिपला परिसरात सेंट पॉलशाळेजवळ उषा करवाडे नावाच्या महिलेचा मृतदेह मिळून आला. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसात ही महिला वाहून गेली होती. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या फटक्यामुळे ५ राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील ३० मार्ग बंद झाले आहते. यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा राज्यातील इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.
वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली
सांगली जिह्यात सततच्या पडणा-या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे. सांगलीच्या बंधा-यावर पाणी वाहू लागले आहे. तर बंधा-याच्या ठिकाणी धबधब्याचे स्वरूप आल्याने तरुण-तरुणी सेल्फी काढण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
पंचगंगा नदी पुलावर पुराचे पाणी
कुरुंदवाड, इचलकरंजी, पंचगंगा नदी पुलावर पुराचे पाणी आले आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी कुरुंदवाडला जोडणा-या पंचगंगा नदीवरील शिरडून गावाजवळील पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला आहे. सध्या ही वाहतूक दुस-या मार्गाने फिरवण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेल्यात आहेत. तसेच कर्नाटकलाही जोडणारे काही रस्ते बंद झाले आहेत.