दोहा : इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या कतारने गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली आहे की, गाझामध्ये शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून (स्थानिक वेळेनुसार) तात्पुरती युद्धविराम सुरू होणार आहे. इस्त्रायली ओलीसांच्या पहिल्या गटाला शुक्रवारी दुपारी चार वाजता सोडण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी सांगितले की, हमासने ओलीस ठेवलेल्या १३ जणांची शुक्रवारी सुटका केली जाईल. उर्वरित तीन दिवस हा आकडा वेगळा असू शकतो, असे ते म्हणाले.
सकाळी ७ वाजता सुरू होणारा युद्धविराम आणि संध्याकाळी ४ वाजता ओलिसांची सुटका करण्याची निश्चित वेळ केवळ शुक्रवारसाठी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, ही मुदत उर्वरित तीन दिवस बदलू शकते. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील चार दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविराम करारांतर्गत ५० इस्रायली ओलीसांच्या बदल्यात १५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.