कोलंबो : श्रीलंकेत सध्या महिला आशिया कप टी२० स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंका संघाची कर्णधार चामरी अटापट्टूने एक इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सोमवारी श्रीलंका आणि मलेशिया महिला संघात सामना झाला. हा सामना श्रीलंकेने १४४ धावांनी जिंकला.
या सामन्यात अट्टापट्टूने ६९ चेंडूत १४ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली. त्यामुळे ती महिला टी२० आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. या शतकाहसह तिने महिला टी२० आशिया कप स्पर्धेत सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा मिताली राजचा विक्रम मोडला आहे. मितालीने क्वालालंपूर येथे २०१८ मध्ये मलेशियाविरुद्धच झालेल्या सामन्यात नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. इतकेच नाही, महिला टी२० आशिया कप स्पर्धेत तर एकाच डावात सर्वाधिक बाऊंड्री (चौकार आणि षटकार मिळून) मारण्याचा विक्रमही तिच्या नावावर झाला आहे.
सर्वाधिक शतके
अट्टापट्टूचे हे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. त्यामुळे आता ती महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत युएईच्या ईशा ओझासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.