लातूर : प्रतिनिधी
राज्यात खाजगी साखर कारखानदारीत नावलौकिक मिळवलेल्या मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अलाईंड इंडस्ट्रीजच्या आसवांनी ११० केएलपीडी क्षमता असलेल्या व दैनदीन एक लाख दहा हजार लिटर उत्पादन होणा-या इथेनॉल प्रकल्पाचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोर,े जागृती शुगरचे जनरल मॅनेजर जी. जी. येवले, एक्साईज इन्स्पेक्टर घुगे, विलास पाटील, डीस्टलरी इन्चार्ज डी. पी. जाधव, अक्षय सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. जागृती शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड तळेगाव येथे हा आसवांनी प्रकल्प सुरू झाल्याने शेतक-यांच्या उसाला अधिक भाव मिळणार असून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागातील उस उत्पादक शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. आता नवीन आसवांनी प्रकल्प सुरू झाल्याने शेतक-यांना अधिक फायदा होणार आहे.