मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्यासाठी ममतांनी मुंबई हायकोर्टात याचिका दखल केली होती. वर्ष २०१६ मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात ममतावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे हायकोर्टाने ममता कुलकर्णीला दिलासा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातचे कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे त्यावर अनेक वर्ष सुनावणी देखील झाली नव्हती.
दरम्यान, या प्रकरणातील गहाळ झालेली कागदपत्रे न्यायालयीन कर्मचारी शोध घेत असल्याची माहिती हायकोर्टाच्या रजिस्ट्रारांनी न्यायालयाला दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार, प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवण्यात यावीत आणि दोन्ही पक्षकारांनी रजिस्ट्रारांना मदत करावी असे निर्देश दिले होते. मात्र तरीदेखील या प्रकरणातील कागदपत्रे सादर होऊ शकले नाहीत. परिणामी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने ममता कुलकर्णीची याचिका स्वीकारत तिच्यावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.
ममता कुलकर्णीने अनेक हिट चित्रपट दिले
ममता कुलकर्णी मागील अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तीने करण अर्जुन, कभी तुम, कभी हम, गँगस्टर, तिरंगा, दिलबर, वक्त हमारा है, भूकंप, सबसे बडा खिलाडी अशे अनेक हिट चित्रपट ममतानी ९० च्या दशकात दिले आहेत.