पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा रेड अलर्ट गुरुवारी दिला आहे. तसेच येत्या आठवड्यात पाऊस सुरू राहणार आहे. पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनावर बंदी आणण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद राहणार आहेत. यामुळे तुमचा मान्सूनचा पर्यटन करण्याचा बेत असल्यास तो रद्द करावा लागणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरात गेल्या ३२ वर्षांमधील सर्वाधिक पाऊस झाला आहे. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी तब्बल ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण, सिंहगड, लोणावळा-खंडाळा, मावळ असे अनेक ठिकाणी पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जातात.
लोणावळ्यात सर्व धबधबे प्रवाहित, पण बंदी
लोणावळ्यातील सहारा पूल, भुशी धरण, लाइन्स पॉईंट या परिसरामध्ये पावसाचा अक्षरश: कहर पाहायला मिळत आहे. या भागांत असणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वाहत आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी व धोका निर्माण होऊ नये याकरिता सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मावळ प्रांताधिकारी यांनी २५ जुलै ते २९ जुलै दरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.