भोपाळ : मध्य प्रदेश भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे दिल्लीत निधन झाले. आज सकाळी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे २६ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मेनिंजायटीसनंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना भोपाळच्या बन्सल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांनंतर, प्रभात झा यांना एअरलिफ्ट करून दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी दीर्घ संघर्षानंतर झा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी बिहारमध्ये अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत. झा हे मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष, राज्यसभा सदस्य आणि भाजपचे राष्ट्रीय सचिवही राहिले आहेत. पत्रकारितेपासून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.