कंधार : राज्यामध्ये गुटखा व सुगंधित सुपारी या अन्न पदार्थांवर राज्य सरकारने बंदी घातली असतानाही या कायद्याचे उल्लंघन करुन अनेक गुटखा माफिया आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत. कंधार शहरासह आता गुटखा माफिया ग्रामीण भागातही सक्रीय झाली असून अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईमधून उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने कंधार शहरात केलेल्या तीन कारवाईमध्ये १३ हजार २४१ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई २१ रोजी मंगळवारी ३ ते ४ च्या सुमारास पोलिसांच्या मदतीने करण्यात असून या कारवाईत छोटे मासे गळाला मोठे तळाला अशी गत झाल्याची चर्चा शहरात होताना दिसून येत आहे.
कंधार शहरात शेजारील राज्यातून गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. शहरातील अनेक भागात गुटखा माफियने जाळे पसरले असून अनेक वेळा या गुटखा माफियांवर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात आली. तरीसुद्धा गुटखा माफिया आपले गोरखधंदा सोडायला तयार नाहीत. अशातच २१ रोजी एका गुप्त माहितीवरुन ऋषिकेश रमेश मरेवार अन्न सुरक्षा अधिकारी सहाय्यक आयुक्त नांदेड व अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाडुरंग पाटील, सतिश सुभाषराव हाके, अनिकेत भगवानराव भिसे यांनी आपल्या सहका-्यांसह कंधार शहर गाठले आणि पोलीस स्टेशन कंधार येथील आदित्य लोणीकर सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी श्रीराने यांची मदत घेत कंधार शहरात तीन ठिकाणी सापळे लावले. या तीन ठिकाणाहून १३ हजार २४१ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.
यामध्ये परमेश्वर किशन चोपवाड व शेख सलमान शेख चांदपाशा यांचे पान शॉप दुकान महाराणा प्रताप चौक कंधार आणि धम्मदिप भगवान कदम यांचे पान शॉप दुकान महाराणा प्रताप चौक साई पूजा बार समोर कंधार अन्न सुरक्षा अधिनियम व मानके कायदा नुसार ऋषिकेश रमेश मरेवार सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी नांदेड यांच्या फियार्दीवरुन कंधार पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उप निरीक्षक मुखेडकर हे करत आहेत. यातील छोट्या माशांवर कारवाई होते, बडे मासे मात्र मोकाटच आहेत त्यामुळे मोठ्या माशावर कारवाई होते का हे पाहणे अचुक्याचे ठरणार आहे.