फतेहाबाद : कावड यात्रेत सातत्याने तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. ताजे प्रकरण हरियाणातील फतेहाबाद येथील आहे. येथे आज कावड्यांनी चांगलाच गोंधळ घातला. एका स्कूल बसने कावड्यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संतप्त झालेल्या कावड्यांनी एकच गोंधळ घातला आणि स्कूल बसची तोडफोड केली. फतेहाबादमधील रतिया भागात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कावड्यांचा एक गट हरिद्वारहून फतेहाबादच्या दिशेने जात होता. दरम्यान, रतिया येथील टोहाणा रोडजवळ स्कूल बसने कावड्यांना धडक दिली. घटनेच्या वेळी बसमध्ये मुले प्रवास करत असल्याची माहिती आहे. संतप्त कावड्यांनी बस अडवली, मुलांना खाली उतरवले आणि बसवर विटा आणि दगडफेक सुरू केली. कावड्यांचा प्रताप पाहून शाळकरी मुले चांगलीच घाबरली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कावड्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.