मुंबई : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका झाडाला लोखंडी साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत एक महिला आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. जंगलात महिला बांधलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी तत्काळ या महिलेची सुटका करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या पूर्वीच्या पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधिका-यांनी दिली आहे. या महिलेने रुग्णालयात उपचार सुरू असताना एक चिठ्ठी लिहून दिली. या चिठ्ठीच्या आधाराने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गच्या जंगलात या महिलेला तिच्या पूर्वीच्या पतीने साखळदंडाने बांधून पळ काढला. याबाबतची माहिती पीडित महिलेने रुग्णालयात एक चिठ्ठी लिहून दिली. यावर महिलेने दावा केला की, तिच्या पूर्वीच्या पतीने तिला ४५० कि.मी. दूर जंगलात आणत सिंधुदुर्गच्या समुद्रकिना-यावरील सोनुर्ली गावातील जंगलात साखळदंडाने बांधून ठेवले. महिलेला बांधून ठेवल्यानंतर या नराधमाने तिथून पळ काढला.
शनिवारी संध्याकाळी एका मेंढपाळाला महिलेच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे या मेंढपाळाने शोध घेतला असता, ही महिला आढळून आली. मात्र या महिलेला पाहताच या मेंढपाळाचा थरकाप उडाला. या महिलेला साखळदंडाने बांधण्यात आले होते. या महिलेजवळ तिचे तामिळनाडूचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि तिच्या अमेरिकेच्या पासपोर्टची प्रत मिळाली. मात्र या महिलेच्या व्हिसाची मुदत संपली असून ती मागील १० वर्षांपासून भारतात राहत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या महिलेला उपचारासाठी गोव्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी या महिलेला मानसिक त्रास असून तिच्याकडून प्रिस्क्रिप्शनही मिळाले, अशी माहिती दिली.