वडीगोद्री ( जालना) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटी येथे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे यांना मंगळवार दि. ३० जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तत्काळ खासगी डॉक्टरांना बोलविण्यात आले. त्यानंतर जरांगे यांना अशक्तपणामुळे सलाईन लावण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मागील वर्षभरापासून विविध आंदोलने, उपोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वी आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले होते. आतापर्यंतचे उपोषणाची त्यांची पाचवी वेळ होती. पाचव्या टप्प्यातील उपोषणास चवथ्या दिवशी स्थगिती दिल्यानंतर मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पीटल येथे उपचारास दाखल झाले. प्रकृती ठीक झाल्यानंतर जरांगे दि २७ जुलै रोजी रुग्णालयातून सुटी घेऊन अंतरवाली सराटीत आले. तेव्हापासून जरांगे यांच्या आगामी रणनीतीवर बैठका सुरू आहेत. तसेच अनेक मान्यवर त्यांच्या भेटीस येत असतात.
दरम्यान, आज दुपारी ४ वाजता अचानक मनोज जरांगे यांना अशक्तपणा वाटून घबराट जाणवली. तत्काळ डॉक्टरांनी भेट देत जरांगे यांची तपासणी केली. अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या शेतातील घरी जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. जरांगे यांचे ब्लडप्रेशर देखील कमी झाल्याची माहिती खासगी डॉक्टरांनी दिली.
ओबीसी नेते राठोड अंतरवाली सराटीत
ओबीसी नेते हरिभाऊ राठोड हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत आले आहेत. जरांगे यांची प्रकृती खालवल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती. सलाईन संपल्यानंतर दोघांमध्ये सध्या संवाद सुरू झाला. आरक्षण या विषयावरच त्यांची चर्चा सुरू आहे.