जयपूर : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी येत्या शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठीचा प्रचार काल संपला. प्रचाराच्या अंतिम टप्यात काँग्रेस, भाजपसह सर्व पक्षांनी आपली ताकद लावली होती. गेल्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच मुकाबला होत आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवगड येथे जाहीर सभा झाली.
राज्यात पुन्हा गेहलोत सरकार सत्तेत येणार नाही असे मोदी यांनी या सभेत सांगितले. भाजपच्या स्टार’ प्रचारकांनी अंतिम दिवशी राज्य पिंजून काढले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली. केंद्रातील विविध योजनांचा आढावा घेत ते म्हणाले की, २००४ ते २०१४ या कालावधीत तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राजस्थानसाठी दोन लाख कोटी रुपये दिले होते.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी, उमेदवारीसाठी निवडसमितीवर दबाव आणि उमेदवारी न मिळाल्याने नाराजीनाट्य पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकविल्याने या दोन्ही पक्षांच्या डोकेदुखीत वाढ झाली.