छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात मध्य पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना मराठवाड्याला मात्र अजून पावसाची प्रतीक्षाच आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत.
आकडेवारीनुसार मराठवाडा विभागात ५९ टक्के पाऊस झाला आहे. मात्र नद्या आणि धरणे अजूनही कोरडीच असल्याचे चित्र आहे, त्यात ही परिस्थिती असताना पुढील २२ दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तविल्याने मराठवाड्यात चिंताजनक परिस्थिती आहे.
जायकवाडी अवघ्या ७ टक्क्यांवर
सध्या जायकवाडी प्रकल्पात अवघा ७ टक्के पाणीसाठा आहे. या धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत असली तरी सिंचनासह, शेती आणि पिण्यास किती दिवस हे पाणी पुरेल याची शंका आहे. मराठवाडा विभागात ११ मोठे, ७५ मध्यम तर ७४९ लघु प्रकल्प आहेत. गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवर ४२ बंधारे आहेत. एकूण ८७७ प्रकल्पांमध्ये अवघा २० टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. त्यामुळे लघु आणि मध्यम प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पिकांना दिलासा
मराठवाड्यात पावसाळा सुरू झाल्यापासून ६० दिवसांत २१ दिवस पाऊस झाला आहे. पर्जन्यमापकांच्या आकड्यांनुसार विभागात ६७९.५ मि.मी.च्या तुलनेत ४०४.२ मि.मी. पाऊस झाल्याचे दिसते आहे. ५९ टक्के पावसामुळे फक्त पिकांना दिलासा मिळाला आहे, धरणांत पाणी आलेले नाही.
बीड, हिंगोलीत काय स्थिती?
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील माजलगाव धरण अजूनही शून्यावर आहे. मांजरा धरणात १.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण २८.५७ टक्के तर येलदरी ३१.७१ टक्के भरले आहे. राज्याच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठा अजूनही सर्वांत कमी असून तो केवळ १७.५६ टक्के एवढा आहे.
नांदेडला दिलासा, परभणीत काय स्थिती?
नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार आता ५० टक्के भरले आहे तर विष्णुपुरी ९४.२३ टक्के भरल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणात २८.४७ टक्के, सीना कोरेगाव प्रकल्प अजून शून्यावरच आहे. परभणीतील निम्न दुधना प्रकल्पात केवळ ८.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.