मुंबई : पंढरीच्या वारीनंतर आता श्रावण महिन्याला सुरुवात होत असून सर्वांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. देशभरात, त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. तर, कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच. यंदा १७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.
२ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.comमे या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या अॅपव्दारे,उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.
२०२ विशेष ट्रेनही
गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणा-या चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुखाचा होणार आहे. कोकणासाठी २०२ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हजारो चाकरमान्यांची ही परवड थांबवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणामध्ये जात असतात. या काळात बस किंवा ट्रेनचे बुकिंग मिळत नाही. त्यामुळे या काळात आता अतिरिक्त २०२ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून आता एसटी महामंडळानेही तब्बल ४३०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, कोकणवासियांना गावाकडे जाण्यासाठी आता सार्वजनिक वाहतूक सहजपणे उपलब्ध होऊ शकेल.