धाराशिव : प्रतिनिधी
गुत्तेदाराने केलेल्या कामाच्या मोजमाप पुस्तिकेवर सह्या करण्यासाठी टक्केवारी म्हणून १० हजाराची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने धाराशिव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शंकर विश्वनाथ महाजन यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दोन वेगवेगळ््या कलमान्वये ११ वर्षाच्या कारावासाची शिक्षा दि. १ ऑगस्ट रोजी सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या असल्याने अभियंता महाजन यांना सात वर्षे जेलची हवा खावी लागणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील गुत्तेदाराने धाराशिव ते गडदेवधरी रस्त्याचे काम केले होते. या कामाच्या मोजमाप पुस्तिकेवर सह्या करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता शंकर महाजन यांनी गुत्तेदाराकडे पंचासमक्ष ३ टक्के प्रमाणे टक्केवारी म्हणून १२ हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार गुत्तेदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एसीबीने सापळा रचला होता. गुत्तेदाराकडून १० हजाराची लाच घेताना सन २०१५ मध्ये पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करून तपासी अधिकारी तत्कालिन पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयात झाली.️ सरकारी अभियोक्ता पी. के. जाधव यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. आरोपी लोकसेवकाचे वकील पी. एम. नळेगावकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकूण न्यायाधीश श्रीमती शेंडे यांनी अभियंता शंकर महाजन यांना कलम ७ अन्वये ४ वर्षाचा कारावास व ५० हजार रूपये दंड, तसेच कलम १३ (१) (ड), १३ (२) अन्वये ७ वर्षाचा कारावास व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कारावास सुनावला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून एसीबीचे पोलिस निरिक्षक नानासाहेब कदम, पैरवी कमर्चारी म्हणून पोलिस हवालदार ए. एस. मारकड, जे. ए. काझी यांनी काम पाहिले.