25.4 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeमहाराष्ट्रस्वप्नील कुसाळेला एक कोटीचे बक्षीस

स्वप्नील कुसाळेला एक कोटीचे बक्षीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, नेमबाज स्वप्नीलचे अभिनंदन!

मुंबई (प्रतिनिधी) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल स्वप्नीलला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली.

स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणा-या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने अभिनंदन, असे नमूद करून शिंदे यांनी या पुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज स्वप्नील कुसळेच्या वडिलांशी मोबाईलवरून संवाद साधत स्वप्नीलच्या यशाबद्दल त्यांचे आणि कुटुंबीयांचे अभिनंदन केले. स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर त्याची कोल्हापुरात भव्य मिरवणूक काढली जाईल, असेही मुश्रीफ यांनी या वेळी जाहीर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR